१२ ऑक्टोबर २०२६

​ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence): जबाबदार नागरिकत्वाची पहिली पायरी

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस १

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence): जबाबदार नागरिकत्वाची पहिली पायरी

​नमस्कार! नवरात्रीच्या या मंगल पर्वावर सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा. देवीच्या या आराधनेसोबतच आपण सर्वांनी एक सुरक्षित आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचा संकल्प करणे ही काळाची मोठी गरज आहे. मोटार वाहन निरीक्षक म्हणून काम करताना रस्त्यांवर रोज अनेक अपघात पाहायला मिळतात. हे अपघात रोखण्यासाठी या नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण रस्ते सुरक्षेचच्या नऊ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत.

​आज पहिल्या माळेला, आपण सुरुवात करूया रस्ते सुरक्षेच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून - म्हणजेच 'ड्रायव्हिंग लायसन्स'.

​अनेक नागरिकांचा असा गैरसमज असतो की, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे केवळ RTO/ट्राफिक पोलिसांना दाखवण्यासाठी किंवा ओळखपत्र (ID Proof) म्हणून वापरण्यासाठी लागणारे एक कार्ड आहे. पण कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहता, लायसन्स म्हणजे शासनाने तुमच्यावर टाकलेला एक मोठा 'विश्वास' आहे. जेव्हा परिवहन विभाग तुम्हाला लायसन्स देतो, तेव्हा शासन हे प्रमाणित करत असते की, "या व्यक्तीला वाहतुकीचे सर्व नियम अवगत आहेत, या व्यक्तीचे वाहनावर पूर्ण नियंत्रण आहे आणि ही व्यक्ती रस्त्यावरील इतर पादचारी व वाहनचालकांसाठी अजिबात धोकादायक नाही."

​शिकाऊ लायसन्स (Learning Licence) ते पक्क लायसन्स (Permanent Licence) मिळवण्याच्या प्रक्रियेत उमेदवाराला दोन महत्त्वाच्या चाचण्या द्याव्या लागतात. पहिली संगणकीय चाचणी, ज्यात वाहतुकीचे नियम, चिन्हे आणि सिग्नल यांची माहिती तपासली जाते. दुसरी प्रत्यक्ष वाहन चाचणी (Track Test), ज्यात उमेदवाराचे वाहनावरील प्रत्यक्ष नियंत्रण पाहिले जाते. जेव्हा परिवहन विभागाचा अधिकारी तुमची चाचणी घेऊन तुम्हाला पास करतो, तेव्हा तो केवळ एका कागदावर सही करत नसून, तुमच्या हाती स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी सोपवत असतो. त्यामुळे या चाचणीकडे एक 'औपचारिकता' म्हणून न बघता, 'सुरक्षेची खात्री' म्हणून बघितले पाहिजे.

​पालकांना माझे विशेष आवाहन आहे की, आजकाल अनेक पालक आपल्या अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुलांना मोठ्या कौतुकाने दुचाकी किंवा चारचाकी चालवायला देतात. हा केवळ कायदेशीर गुन्हा नाही, तर आपण आपल्याच मुलांच्या जीवाशी खेळत आहोत, हे पालकांनी समजून घ्यायला हवे. वय आणि परिपक्वता नसताना हातात आलेला वेग अनेकदा जीवघेणा ठरतो. मोटार वाहन कायद्यानुसार १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी २५ हजार दंड, वाहनाची नोंदणी रद्द आणि पालकांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे.

आजचा संकल्प:
नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया - "मी ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवणार नाही. लायसन्स काढताना मी वाहतुकीचे सर्व नियम प्रामाणिकपणे शिकून घेईन आणि रस्त्यावर वाहन चालवताना त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून एक 'जबाबदार नागरिक' असल्याची ओळख निर्माण करेन."

​सुरक्षिततेच्या या प्रवासात महाराष्ट्र मोटार वाहन विभाग नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. सुरक्षित राहा, नियम पाळा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाहन नोंदणी (Vehicle Registration): तुमच्या वाहनाची अधिकृत ओळख

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस २ वाहन नोंदणी (Vehicle Registration): तुमच्या वाहनाची अधिकृत ओळख नवरात्रीच्या दुसऱ्या माळेच्या निमित्ताने सर्व...