१८ ऑक्टोबर २०२६

ओव्हरलोडिंग, अवैध प्रवासी वाहतूक आणि दंडात्मक कारवाई: त्रास देण्यासाठी नव्हे, तर जीव वाचवण्यासाठी!

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ८

ओव्हरलोडिंग, अवैध प्रवासी वाहतूक आणि दंडात्मक कारवाई: त्रास देण्यासाठी नव्हे, तर जीव वाचवण्यासाठी!

​नवरात्रीच्या आठव्या माळेच्या (दुर्गाष्टमीच्या) सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! नवरात्रीचा आठवा दिवस देवी 'महागौरी'ला समर्पित असतो. देवीचे हे रूप अत्यंत शांत असून, ते जीवनातील 'समतोल' राखण्याचे प्रतीक आहे. परंतु तीच देवी जेव्हा वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी हातात शस्त्र उगारते, तेव्हा तिचा उद्देश कोणाला त्रास देणे नसून, जगाचे रक्षण करणे हाच असतो. अगदी याच भावनेशी जोडलेला आजचा आपला विषय आहे - 'ओव्हरलोडिंग, अवैध प्रवासी वाहतूक आणि दंडात्मक कारवाई (Enforcement)'.

​प्रत्येक वाहनाच्या प्रकार, बांधणी, टायर्स, यानुसार माल किंवा प्रवासी वाहून नेण्याची एक निश्चित क्षमता (GVW - Gross Vehicle Weight किंवा Seating Capacity) ठरवलेली असते. परंतु, केवळ थोड्या जास्त नफ्यासाठी अनेकदा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा खूप जास्त माल किंवा प्रवासी भरले जातात. ओव्हरलोडिंगमुळे वाहनाचे संतुलन पूर्णपणे बिघडते. अतिरिक्त वजनामुळे टायर्सवर दाब पडून ते धावत्या गाडीत फुटण्याची (Tyre Burst) शक्यता सर्वाधिक असते. सोबतच रस्ते खराब होण्याची शक्यता तसेच, क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने वाहनाचे ब्रेक्स प्रभावीपणे काम करत नाहीत, ज्यामुळे अत्यंत भीषण अपघात होतात.

​यासोबतच दुसरा प्रकार म्हणजे 'अवैध प्रवासी वाहतूक'. सणासुदीच्या काळात, प्रवाशांची मागणी जास्त असते अशा वेळी भाडेवाढ करून सुद्धा अधिक पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. तसेच ग्रामीण भागात मजुरांना मालवाहू वाहनातून (उदा. ट्रक, ट्रॅक्टर, पिक-अप किंवा मालवाहू रिक्षा) अक्षरशः जनावरांसारखे कोंबून नेले जाते. अशा वाहनाचा अपघात झाल्यास एकाच वेळी अनेक निष्पाप जीव जातात. अशा वाहनातून प्रवास करताना अपघात झाल्यास विमा कंपनीकडून मृत्यूची किंवा उपचारांची कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही, ज्यामुळे पीडित कुटुंबांची अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ येते.

​मोटार वाहन विभागाचा अधिकारी म्हणून तपासणी दरम्यान जेव्हा आम्ही अशी ओव्हरलोड वाहने किंवा अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने पकडतो, तेव्हा अनेक वाहनचालक संतापतात आणि आमच्याशी हुज्जत घालतात, तर काही राजकिय बळाचा वापर करून दबाव निर्माण करतात. तसेच यादरम्यान जेव्हा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, तेव्हा "शासन आणि RTO फक्त महसूल गोळा करण्यासाठी आणि जनतेला नाहक त्रास देण्यासाठीच दंड आकारते," असा एक मोठा गैरसमज समाजात पाहायला मिळतो.
​परंतु, प्रत्यक्ष अपघातस्थळी गंभीर दुखापत झालेल्या प्रवाशांकडे किंवा व्यक्तींकडे पाहणाऱ्या नजरेतून या कारवाईकडे बघा. आमचा उद्देश शासनाची तिजोरी भरणे नसून, 'आपल्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालणे आणि निष्पाप जीव वाचवणे' हाच असतो. जेव्हा एखादा चालक नियम मोडतो, तेव्हा तो दंड म्हणजे त्या व्यक्तीला भविष्यात होऊ शकणाऱ्या जीवघेण्या अपघाताची जाणीव करून देणारी एक 'सक्त ताकीद' असते. 
अपघातात प्राण गमावल्याचे दुःख किंवा रुग्णालयाचे लाखो रुपयांचे बिल पाहता, नियम मोडल्याबद्दल होणारा ५०० किंवा हजार रुपयांचा दंड हा खऱ्या अर्थाने तुमचा जीव वाचवणारा एक 'कटू पण आवश्यक उपाय' आहे. अशा गंभीर चुकांसाठी आता ड्रायव्हिंग लायसन्स (License) निलंबित करण्याची कठोर तरतूदही कायद्यात आहे.

​आज दुर्गाष्टमीच्या पवित्र दिवशी आपण सर्व मिळून संकल्प करूया की, आपण जास्त पैशांच्या मोहापायी वाहनाची क्षमता कधीही ओलांडणार नाही, अवैध प्रवासी वाहतूक करणार नाही आणि दंडात्मक कारवाईच्या भीतीने नव्हे, तर स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे प्रामाणिकपणे पालन करू. नियम पाळणे हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची आणि देवीची आराधना आहे!

१७ ऑक्टोबर २०२६

मद्यपान आणि अतिवेग (Drunk Driving & Overspeeding): रस्ते सुरक्षेतील 'महिषासुर'

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ७

​मद्यपान आणि अतिवेग (Drunk Driving & Overspeeding): रस्ते सुरक्षेतील 'महिषासुर'

​नवरात्रीच्या सातव्या माळेच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! नवरात्रीचा सातवा दिवस देवी 'कालरात्री'ला समर्पित असतो. हे रूप अज्ञानाचा आणि दुष्ट प्रवृत्तींचा भयंकर संहार करणारे मानले जाते. या पर्वात आपण 'महिषासुरमर्दिनी'चीही आराधना करतो, जिने उन्मत्त महिषासुराचा वध करून जगाचे रक्षण केले. आजच्या आधुनिक आणि गतिमान काळात, आपल्या रस्ते सुरक्षेसमोरही असेच दोन अत्यंत भयंकर 'महिषासुर' उभे आहेत - 'मद्यपान करून वाहन चालवणे' (Drunk Driving) आणि 'अतिवेग' (Overspeeding). आज आपण रस्ते सुरक्षेच्या याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत.

​मद्यपान करून गाडी चालवणे हा रस्त्यांवरील सर्वात मोठा आणि जीवघेणा गुन्हा आहे. दारूच्या नशेत चालकाचे स्वतःच्या शरीरावरील, डोळ्यांवरील आणि मेंदूवरील नियंत्रण पूर्णपणे सुटते. समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग आणि अंतर याचा अचूक अंदाज मद्यधुंद चालकाला येत नाही, ज्यामुळे अत्यंत भीषण अपघात होतात. यात अनेकदा नशेत असलेल्या चालकासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचाही नाहक बळी जातो. मोटार वाहन कायद्यानुसार, 'ड्रंक अँड ड्राईव्ह'साठी १० हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि प्रसंगी तुरुंगवासाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. तसेच, अशा गुन्ह्यामध्ये चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची कायदेशीर कारवाई देखील केली जाते.

​यासोबतच दुसरा राक्षस आहे तो म्हणजे 'अतिवेग'. आजकाल तरुणाईमध्ये वेगाचा थरार (Thrill of Speed) अनुभवण्याची मोठी क्रेझ आहे. परंतु, "वेग जितका जास्त, तितका मृत्यू जवळ" हे रस्ते सुरक्षेचे भीषण वास्तव आहे. अतिवेगात गाडी चालवताना अचानक समोर एखादे वाहन, खड्डा किंवा प्राणी आल्यास, गाडीवर नियंत्रण मिळवणे जवळपास अशक्य होते. म्हणूनच, रस्त्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक वाहनांसाठी सुरक्षित वेगमर्यादा निश्चित केलेली असते. उदाहरणार्थ, समृद्धी महामार्गावर खाजगी वाहनांसाठी १२० किमी/तास अशी वेगमर्यादा असली, तरी अनेक चालक त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन वाहने चालवतात.

​अशा अतिवेगाला लगाम घालण्यासाठी आता पोलीस आणि RTO विभागाकडून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांना न थांबवता थेट 'ई-चालान' (e-Challan) पाठवून दंडात्मक कारवाई केली जाते. याकरिता बऱ्याच रस्त्यांवर अत्याधुनिक 'स्पीडगन' (Speed Gun) युक्त वाहनांचा (Interceptor Vehicles) वापर केला जात आहे. यासोबतच, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि समृद्धी महामार्गावर अत्याधुनिक 'ITMS' (Intelligent Traffic Management System) यंत्रणा बसविण्यात आली आहे, जी अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांना आपोआप ओळखून त्यांच्यावर कारवाई करते. तसेच, व्यावसायिक (Transport) वाहनांचा वेग आपोआप मर्यादित राहावा, यासाठी त्यांच्यात 'स्पीड गव्हर्नर' (वेग नियंत्रक) बसवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.

​मद्यपान आणि अतिवेग हे दोन्ही एकत्र आल्यास तो साक्षात मृत्यूचाच सापळा बनतो. एका क्षणाच्या थरारामुळे किंवा व्यसनामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कायमचे होतांना आम्हाला कितीतरी वेळा दिसते. 'घरी आपली कुणीतरी आतुरतेने वाट पाहत आहे', त्यामुळे आपल्याला लवकर नाही तर सुरक्षित घरी पोहोचणे महत्त्वाचे आहे, ही जाणीव प्रत्येक चालकाला असली पाहिजे.

​आज नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया. "मी मद्यपान करून कधीही वाहन चालवणार नाही, आणि नेहमी वेगमर्यादेचे (Speed Limit) पालन करेन." स्वतःमधील या व्यसनाधीनता आणि बेजबाबदारपणा रुपी महिषासुराचा वध करणे, हीच खऱ्या अर्थाने रस्ते सुरक्षेची आणि देवीची खरी आराधना आहे!

१६ ऑक्टोबर २०२६

मोटार वाहन कर (Motor Vehicle Tax): राज्याच्या विकासातील आपला अभिमानास्पद वाटा

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ६

मोटार वाहन कर (Motor Vehicle Tax): राज्याच्या विकासातील आपला अभिमानास्पद वाटा

नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित असतो. देवीचे हे रूप शक्ती, कठोर शिस्त आणि सामाजिक कर्तव्याचे प्रतीक मानले जाते. याच सामाजिक कर्तव्याच्या आणि शिस्तीच्या भावनेतून आज आपण परिवहन विभागाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे 'मोटार वाहन कर' (Motor Vehicle Tax).

अनेकदा नवीन वाहन खरेदी करताना किंवा व्यावसायिक वाहने चालवताना आपण परिवहन विभागाकडे जो कर भरतो, त्याकडे अनेक वाहनचालक केवळ एक 'आर्थिक बोजा' किंवा 'सक्तीचा खर्च' म्हणून बघतात. परंतु प्रत्यक्षात, हा कर म्हणजे आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी आणि स्वतःच्याच सुरक्षिततेसाठी दिलेले एक बहुमूल्य व थेट योगदान असते.

महाराष्ट्र मोटार वाहन कर कायद्यानुसार, आपल्या राज्यामध्ये वापरासाठी ठेवलेल्या प्रत्येक वाहनाने मोटार वाहन कर भरणे बंधनकारक आहे. वाहन कर हा मुख्यत्वे वाहनाचा प्रकार, किंमत, वजन, आसन क्षमता, वाहनाचे वय आणि उपयोग अशा बाबींवर अवलंबून असतो. काही वाहनांसाठी (उदा. मोटारसायकल, कार, ऑटोरिक्षा, हलके मालवाहू वाहन इत्यादी) वाहन खरेदी करतानाच नोंदणीच्या वेळी तो 'एकदाच' (One Time Tax) घेतला जातो. तर दुसऱ्या बाजूला, काही व्यावसायिक वाहनांसाठी (उदा. मालवाहू ट्रक, ट्रॅव्हल्स, बस, टॅक्सी) त्यांच्या आसन किंवा वजन क्षमतेनुसार दरवर्षी कर भरणे बंधनकारक असते. यामध्ये सोयीसाठी दर तिमाहीला किंवा मासिक स्वरूपात कर भरण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असतो. यासोबतच शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि दिव्यांग व्यक्तींच्या वापरासाठी असलेल्या विशेष वाहनांना मोटार वाहन करातून संपूर्ण सूट (Tax Exemption) दिलेली आहे, जेणेकरून या घटकांना आर्थिक दिलासा मिळावा.

प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने, जे जुने वाहन जास्त प्रदूषण करण्याची शक्यता असते, अशा १५ वर्षांवरील खाजगी व ८ वर्षांवरील व्यावसायिक वाहनांना नूतनीकरणावेळी 'पर्यावरण कर' (Green Tax) आकारला जातो. तर याउलट, जी वाहने प्रदूषण कमी करण्यास मदत करतात किंवा प्रदूषण करतच नाहीत (उदा. इलेक्ट्रिक वाहने/EV), अशा (३० लाखांपेक्षा कमी किंमत) वाहनांना शासनाकडून मोटार वाहन करातून १०० टक्के सूट देण्यात आली आहे, जेणेकरून प्रदूषणमुक्त वाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळावे.

एखादे वाहन जर वापरात नसेल (Non-Use) किंवा दुसऱ्या राज्यात गेले असल्याचे RTO ला रीतसर कळविले असल्यास, त्याला न वापरलेल्या कालावधीचा कर परत (Refund) देण्यात येतो. परंतु, दुसऱ्या राज्यात गेल्यास तेथील कर नव्याने भरावा लागतो. ज्या नोकरदारांची वारंवार वेगवेगळ्या राज्यांत बदली होते, त्यांना प्रत्येक वेळी नवीन राज्यात वाहन नोंदणी करून तिथला कर भरण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने 'BH Series' (भारत सिरीज) हा नवीन प्रकार सुरू केला आहे. या वाहनाला कोणत्याही एका राज्याचा क्रमांक न देता राष्ट्रीय स्तरावरील ओळख दिली जाते आणि अशा वाहनास १५ वर्षांचा कर एकदाच भरण्याऐवजी दर दोन वर्षांनी वाहन कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहन तपासणी करताना आम्हाला अनेकदा कर चुकवून धावणारी वाहने आढळतात. कर न भरणे हा केवळ 'महाराष्ट्र मोटार वाहन कर कायद्याचा' भंग नाही, तर तो राज्याच्या प्रगतीत जाणीवपूर्वक आणलेला अडथळा आहे. कर न भरल्यास शासनाकडून थकीत करावर दरमहा २ टक्के याप्रमाणे मोठा दंड (Penalty) आकारला जातो. सोबतच, असे वाहन जप्त (Detain) करण्याची आणि प्रसंगी वाहनाचा लिलाव करून कराची वसुली करण्याची अत्यंत कठोर कायदेशीर तरतूद आहे. अनेकदा थकीत कर आणि दंडाची रक्कम मूळ वाहनाच्या किमतीएवढी होते, ज्यामुळे वाहनमालकाचे अतोनात आर्थिक नुकसान होते.

अनेकदा असेही बघायला मिळते की, काही लोक कर भरायला लागू नये म्हणून परस्पर आपले जुने वाहन RTO ला न कळवता थेट भंगारात विकतात. परंतु, "मोटार वाहन कर ही अशी बाब आहे, जी कोणालाच चुकत नाही." जर तुम्ही तुमचे वाहन शासनाला न कळवता भंगारात विकले, तरीही संगणकीय प्रणालीनुसार तुमचा कर सुरूच राहतो आणि अंतिमतः तो थकीत कर तुमच्याकडून 'जमीन महसूल अधिनियमानुसार' (Land Revenue Code) तुमच्या मालमत्तेवर बोजा चढवून सक्तीने वसूल केला जातो.

आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण सर्व वाहनमालक आणि नागरिक मिळून हा खंबीर संकल्प करूया की, आपण आपल्या वाहनाचा कर नेहमी वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरू. आपला प्रामाणिक कर हा एका सुरक्षित, आधुनिक आणि प्रगत महाराष्ट्राचा भक्कम पाया रचतो. राज्याच्या विकासात आपला अभिमानास्पद वाटा उचलणे, हीच खऱ्या अर्थाने आपली राष्ट्रभक्ती आणि देवीची खरी उपासना आहे.

ओव्हरलोडिंग, अवैध प्रवासी वाहतूक आणि दंडात्मक कारवाई: त्रास देण्यासाठी नव्हे, तर जीव वाचवण्यासाठी!

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ८ ओव्हरलोडिंग, अवैध प्रवासी वाहतूक आणि दंडात्मक कारवाई: त्रास देण्यासाठी नव्हे, तर जीव वाचवण्यासाठी! ​नवरात्री...