लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ फेब्रुवारी २०२४

सुखी होण्याचं गुपित

          "द अल्केमिस्ट" या पुस्तकाबाबत स्पर्धा परीक्षेच्या एका डेमो लेक्चर मध्ये ऐकायला मिळाले. म्हटलं वाचूया हे पुस्तक पण आपल्याला इंग्लिश कुठे एवढं समजतंय म्हणून त्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केलेले मिळते का म्हणून शोध घेतला आणि ते मिळाल. 

            हॉस्टेलमधील एका रविवारी टेरेस वरील पाण्याच्या टाकीवर बसून सतत तीन चार तास बसून पुस्तक संपवलं. तसं असतंच ज्याप्रमाणे एखादा Movie खूप आवडतो आणि movie संपेपर्यंत उठू वाटत नाही. तसच एखाद पुस्तक आवडलं तर ते पुस्तक संपेपर्यंत काहीच करू वाटत नाही. पुस्तक खूप छान आहे. सर्वांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी तर आवर्जून वाचाव अस प्रेरणादायी आहे. या पुस्तकामधील एक किस्सा खूप भावला. आयुष्यात सुखी कसं व्हायचं.हे त्या गोष्टीतून शिकलोय.

ती गोष्ट अशी:- 

           एकदा एका दुकानदाराने आपल्या मुलाला जगातल्या सर्वाधिक ज्ञानी माणसाकडे पाठवलं. सुखी होण्याचं गुपित त्याला जाणून घ्यायचं होतं. पुढचे चाळीस दिवस तो मुलगा वाळवंटात भटकत राहिला. सरतेशेवटी, एका उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या सुंदर किल्ल्यापाशी पोहोचला. तो ज्ञानी माणूस तिथेच राहत होता.

           आपल्या नजरेला एखादा साधू किंवा तपस्वी पडेल अशा विचारात दुकानदाराचा मुलगा पुढे झाला. किल्ल्याच्या भव्य आणि मुख्य दालनात तो येऊन पोहोचला. तिथे चांगलीच गजबज होती. अनेक व्यापाऱ्यांची ये-जा सुरू होती. घोळक्यात उभं राहून लोक गप्पांत रमले होते. एका बाजूला मंद वाद्यसंगीत वाजवलं जात होतं. त्या भागातील स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल एका रुंद टेबलवर दिसत होती. तो ज्ञानी माणूस तिथे जमलेल्या प्रत्येकाशी काही ना काही संवाद साधत होता. दोन तास मुलाला तिष्ठत राहावं लागलं. त्यानंतर कुठे त्या ज्ञानी माणसाचं लक्ष मुलाकडे गेलं.

            तो तिथे का आला आहे हे त्या ज्ञानी माणसाने एकाग्र चित्ताने ऐकून घेतलं, सुखाचं गुपित सांगायला त्याला त्या क्षणी मुळीच वेळ नव्हता म्हणून त्याने सुचवलं की, मुलाने दोन तास राजवाड्यात फेरफटका मारून यावा.

            मुलगा तत्परतेने 'हो' म्हणाला. 'एक मात्र कर,' असं म्हणत त्या ज्ञानी माणसाने मुलाच्या हातात एक चमचा ठेवला. त्या चमच्यात तेलाचे दोन थेंब होते. 'तू जेव्हा फेरफटका मारशील तेव्हा या चमच्यामधलं तेल सांडणार नाही याकडे लक्ष दे.'

            हातातील चमच्यामधल्या तेलावर नजर खिळवून तो मुलगा राजवाड्यात फेरफटका मारू लागला. पुढचे दोन तास तो अनेक कक्षांतून फिरला. कित्येक जिने चढला आणि उतरला. वेळ संपताच तो पुन्हा मुख्य दालनाकडे परत आला. 'छान!' ज्ञानी माणसाने त्याचं स्वागत केलं, 'भोजनकक्षात भिंतीवर लटकवलेले पर्शियन पडदे तू पाहिलेस का? जो बगिचा आकाराला आणण्यात मुख्य माळ्याचे दहा वर्षं गेले तो तू पाहिलास का? माझ्या ग्रंथालयात जतन करून ठेवलेले चर्मपत्रांचे जुने दस्तऐवज तुला दिसले का?

            त्या मुलाला संकोच वाटला. यांपैकी काहीच त्याच्या दृष्टीस पडलं नव्हतं, अशी कबुली त्याने दिली. ज्ञानी माणसाने सांभाळायला दिलेल्या तेलाच्या दोन थेंबांवर त्याचं चित्त एकवटलं होतं.

           'काही हरकत नाही! पुन्हा जा आणि माझ्या या विलक्षण जगातील एक एक गोष्टीचं अवलोकन करून ये. एखाद्या व्यक्तीचं घर आपल्याला परिचयाचं झालं नसेल, तर आपल्याला त्याच्यावर विश्वास कसा टाकता येईल?'

             मुलाने सुटकेचा निःश्वास टाकत चमचा हातात धरत पुन्हा फेरफटक्याला सुरुवात केली. या वेळेस कुठलीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटली नाही. भिंती, छत, आजूबाजूचा परिसर, बगिचा, सभोवतालच्या पर्वत रांगा, सुंदर, सुगंधी फुलं आणि या साऱ्यामागे असलेली सौंदर्यदृष्टी; सारं काही त्याने निवांत बघितलं. परत आल्यावर त्याने प्रत्येक गोष्टीचा आढावा दिला.

             त्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर ज्ञानी माणसाने विचारलं, 'ते सगळं ठीक आहे रे; पण चमच्यामधलं तेल कुठे गेलं? मी तुला चमच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं.'

            हातातल्या चमच्याकडे पाहताच तो रिकामा असल्याचं मुलाच्या लक्षात आलं.

             त्याचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानी माणूस म्हणाला, 'मी तुला एकच सल्ला देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी पाहणं आणि त्याच वेळेस हातातल्या चमच्यामधलं तेल न सांडू देणं हेच सुखाचं लक्षण आहे."

           हे असंच असतं जीवन जगताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या गोष्टीतून शिकण्यासारखं खूप आहे. शाळेत-कॉलेजमध्ये असताना मज्जा मस्ती करायची कारण ते दिवस कधीच पुन्हा अनुभवायला मिळणार नाहीत पण सोबतच चमच्यामधील तेल म्हणजे अभ्यास, घरच्या परिस्थितीची जाणीव, घरच्यांच्या अपेक्षा याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे म्हणजे सांगड घालता आली पाहिजे. अजून शिकण्यासारखं खूप आहे जसे की आपल काम आणि आपले छंद, परिवार, हेल्थ यांची सांगड घालायला जमली म्हणजे आपल्याला सुखी कसं व्हायचं हे जमलं.

२४ ऑक्टोबर २०२३

सीमोल्लंघन

प्रत्येक व्यक्तीच्या काही सीमा असतात, त्याचे उल्लंघन हा मानवाचा स्वभावच नाही. पण खूप जण असे असतात की ते आपापल्या zone (comfort zone) मध्ये आनंदी असतात मग काय गरज आपल्या त्या झोन च्या बाहेर जाण्याची. 

पण काही लोक असतात ते नेहमी आपल्या ज्ञानाच्या, व्यवहाराच्या कक्षा रुंदवण्याचा नेहमी प्रयत्न करतात.

या एकविसाव्या शतकात आपण आपल्या क्षेत्रात बळकट आणि update असेल तरच आपण टिकून राहू शकतो. 

काळ असा आहे की आपण जर मेकॅनिकल इंजिनिअर पार्श्वभूमी असलेले असाल तर गरजेचे नाही की फक्त आपल्याला तेव्हढंच जमायला हवं. आपल्याला संगणक, माहिती तंत्रज्ञान,  सामान्य ज्ञान, व्यावहारिक गणित,  इतिहास, भूगोल, समाजशास्त्र अशा बऱ्याच क्षेत्रातील माहिती असणे गरजेचे आहे तरच आपण आजच्या महिती तंत्रज्ञाच्या युगात टिकू शकतो. तसच हे इतर क्षेत्रातील लोकांना पण लागू होते. 

इतिहासात आपल्याला आढळते की आजच्याच मुहूर्तावर राजे महाराजे त्यांचे साम्राज्य विस्तारण्यासाठी मोहिमा सुरू करायचे, व्यावसायिक आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विदेशी मोहीमा राबवायचे. 

मग आपण कुठवर आपल्या सीमेमध्येच अडकून राहणार. आपल्याला पण आपल्या ज्ञानाच्या मोहिमा राबवाव्या लागतील आणि विस्तार करावा लागेल आपल्या बौद्धिक साम्राज्याचा. 

वेळ आहे मित्र-मैत्रिणींनो आपल्या सीमा रुंदवण्याचा म्हणजेच सीमोल्लंघनाची.... तर चला...सीमा ओलांडूया !

मित्रहो...आज विजयादशमी. तुम्ही ज्या कुठल्याही क्षेत्रात असाल...तिथल्या सीमा ओलांडा. प्रगतीची नवनवीन शिखरे गाठा आणि मैत्रीचे...प्रेमाचे सोने वाटा. नव्या गोष्टी करण्यासाठी तुमचा प्रत्येक दिवस मुहूर्ताचा असावा..

०७ ऑक्टोबर २०२३

झुरळ

बदल हा निसर्गाचा नियम
बदलणाऱ्या काळानुसार आपल्याला बदलायला हवे.
येणारी प्रत्येक वेळ ही कठीण असते त्यानुसार आपली सहनशक्ती, विचारशक्ती बदलायला हवी.
अभ्यास करतांना काही गोष्टींचा मनावर विपरीत परिणाम न होता आपल्या पद्धतीने अभ्यास करत राहणे महत्वाचे असते, 
नाही तर मग परीक्षा समोर गेली म्हणून नंतर अभ्यास करणार किंवा अभ्यास करून काय फायदा जर वेळेवर परीक्षाच होत नसेल तर, असे विचारच आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. 
त्यामुळे आता काय निर्णय घेताय त्यावर उद्याचा भविष्यकाळ अवलंबून असतो.
डार्विनचा सिध्दांत आहे ना, Survival of the fittest.
म्हणजे काळानुसार जो स्वतःला बदलून घेणार तोच इथे टिकणार आहे.  
झुरळ महिती आहे का? हो झुरळच (Cockroach) ही अशी किटकाची जात आहे की जे 3000 ते 3500 लाख वर्षांपासून टिकून आहे. 
या कालावधीत महाशक्तिशाली डायनसोर सुद्धा नष्ट झाले कारण की ते निसर्गाप्रमाणे स्वतःला बदलवू शकले नाहीत (वेळ आली तेव्हा धावू शकले नाही). 
अर्थातच म्हणजे झुरळाने स्वतःला काळानुसार बदलून घेतले, नाहीतर जीथे मोठे मोठे प्राणी टिकू शकले नाही तिथे हे लहान कीटक कस काय टिकू शकतो, उत्तर एकच ते म्हणजे 'बदल' किंवा 'अनुकूलता' (Adaption). 
आताचा काळ पण आपल अस्तित्व टिकवण्याचा काळ आहे, यामध्ये आपण स्वतःमध्ये काही बदल न करता टिकू शकत नाही. 
त्यामुळे  ज्याप्रमाणे पाण्याला कोणत्याही भांड्यात टाकले तर तो त्याचा आकार घेतो म्हणजे  स्वतःचे वस्तुमान न बदलता फक्त आकारमान बदलतो .
त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला परिस्थितीनुसार बदलावं  लागेल तरच आपण टिकवून राहू शकू,
नाहीतर सर्वात बुद्धीमान समजल्या जाणाऱ्या प्राण्याचा पण या पृथ्वीवरुन नाश होऊ शकतो आणि टिकणार फक्त झुरळ...
इसलीए पानी की तरह बनो,
जो घागर (मटका) को भी अपना करे
और वक्त आए तो सागर (संमुदर) को भी भरे...
Be a Cockroach...
जीवनाचा हा खेळ खुप वेळेपर्यंत चालणार इथे जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नसून इथे फक्त टिकवून राहणे महत्वाचे आहे...

२७ जुलै २०२२

मोटार वाहन परवाना

चिंटू पिंटूचा Permit या विषयावरील संवाद…

चिंटू:- परवाना म्हणजे काय?
         पिंटू;- परवाना म्हणजे एखादी गोष्ट करण्याची परवानगी जसे की वाहन चालवण्यासाठी परवाना म्हणजे वाहन अनुज्ञप्ती (Driving License) आणि वाहन वापरून कोणता व्यवसाय करायचा असेल म्हणजे प्रवासी वाहतूक किंवा मालवाहतूक तर त्यासाठी लागतो तो वाहन परवाना म्हणजेच परमिट.

चिंटू:- पण मग संविधानाच्या कलम 19 (1) (g) नुसार तर व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे तर मग Permit ची आवश्यकता का?
          पिंटू;- एकदम बरोबर त्याच संविधानाच्या कलम 19 (6) नुसार, जे काही स्वातंत्र्य 19 (1) (g) नुसार दिलेले आहेत त्या स्वातंत्र्यावर काही निर्बंध जनतेच्या हितासाठी असू शकतात.  म्हणजेच उद्या कोणीही उठून एखादा डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाही त्यासाठी विशिष्ट शिक्षणाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मोटार  वाहनाचा उपयोग करून व्यवसाय करायचा असेल तर किंवा एखादे Transport म्हणून वापरायचे असलं तर मोटर वाहन कायद्याच्या कलम 66 नुसार परवाना आवश्यक आहे.

चिंटू:-मग कोणतेही वाहन व्यवसाय करण्यासाठी वापरू शकतो का?
         पिंटू;- नाही त्या वाहनाची नोंदणी Transport Category मध्येच झालेली असावी.

चिंटू:- मग अस आहे का की सर्व Transport वाहनांना परवान्याची आवश्यकता आहे?
        पिंटू;- तसं पण नाही मोटर वाहन कायद्याच्या कलम 66 (3) नुसार काही वाहनांना त्यापासून सूट दिलेली आहे जसे की ॲम्बुलन्स, पोलिसांची वाहने, इत्यादी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य लोक जी वाहने मालवाहतुकीसाठी वापरतात ती त्यांचा GVW जर 3000 Kg खाली असेल ती वाहने जसे की Tata Ace.

चिंटू:- अच्छा मग परमिट एकाच प्रकारचे असते की त्यामध्ये पण वेगळे प्रकार असतात?
         पिंटू;- खूप प्रकार आहेत जसे की राज्य प्रवासी वाहतूक करण्यासाठी Stage Carriage Permit, Contract Carriage Permit, मालवाहतूक करण्यासाठी Goods Carriage Permit.  तसेच देशाच्या स्तरावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी-Tourist permit, All India Tourist Permit आणि मालवाहतूक करण्यासाठी-National Permit तसेच कमी कालावधीसाठी Temporary Permit आणि Special Permit असे खूप प्रकार आहेत 

चिंटू:- परमिट काढायचं कसं मग?
        पिंटू;- आता समजा तुमच्या कडे Transport मध्ये नोंदणी केलेले वाहन आहे किंवा विकत घ्यायचे आहे  तर जवळच्या RTO कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा आणि त्यांना मोटर वाहन कायद्यानुसार जर तुमचे वाहन, तुमची आर्थिक परिस्थिती आणि इतर बाबी योग्य वाटत असतील तर ते तुम्हाला परमिट देतील.

चिंटू:- अच्छा! म्हणजे RTO कार्यालय परमिट देते तर?
       पिंटू:- नाही तसं बघायला गेलं तर RTO  हा RTA  म्हणजेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा सदस्य-सचिव या नात्याने सर्व कामकाज करतो म्हणून त्या कार्यालयात आपल्याला परमिट मिळते.  

चिंटू:- आता हे RTA काय आहे?
          पिंटू;- RTA  हे प्रादेशिक स्तरावर वाहन परवान्यांचे सर्व कामकाज स्थापन केलेलं प्राधिकरण ज्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर आरटीओ हे सदस्य-सचिव आणि पोलीस आयुक्त (परिवहन) किंवा पोलीस अधीक्षक हे सदस्य असतात. पण या पण या प्राधिकरणाचे सर्व कामकाज म्हणजे परवानासाठी आलेला अर्ज स्वीकारणे आणि इतर काही काम असतील तर ते RTO मार्फत केले जातात. 

चिंटू:- बर मग माझ्याकडे समजा Transport वाहन आहे आणि परमिट नसेल तर.. 
      पिंटू;- Transport वाहन हे विनापरवाना वापरणे हा गुन्हा आहे त्यासाठी मोटार वाहन कायद्याच्या कलम 192 (A) नुसार 10,000 रुपये दंड देतात म्हणून Trasnport वाहनांना परमिट असणे हे खूप महत्त्वाचे आहे

चिंटू:- जर मग Transport वाहनाने इतर गुन्हे केले तर जसे की ते वाहन Without फिटनेस चालविणे
       पिंटू;- मग दंड होणार की जर तुमचे वाहन HGV (Heavy Goods Vehicle) असेल तर त्याला ४००० रुपये CF आणि ८०००  रुपये DA असा एकूण १२००० रुपये दंड मिळणार

चिंटू:- आता CF आणि DA हा काय प्रकार नेमका 
      पिंटू;- CF म्हणजे  मोटर कायद्याचा एखादा गुन्हा मिटवण्यासाठी दिलेली कायदेशीर रक्कम म्हणजेच तडजोड शुल्क त्यालाच Componding Fee (CF) म्हणतात आणि तुमचे वाहन परवाना घेऊन वापरत आहेत म्हणून सदर वाहनाचा परवाना निलंबना ऐवजी दिलेली रक्कम म्हणजेच DA (Departmental Action). 

चिंटू:- अरे बापरे हे तर म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा, असं चालतंय का? 
      पिंटू;- चालतंय कि, एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा एकाच Authority द्वारे देता येत नाही परंतु तुमच्या गाडीच्या बाबतीत दोन Authority कार्यरत आहेत जसे की एक वाहन म्हणून RTO तर परवाना आहे म्हणून RTA म्हणून दोन शिक्षा चालतात. 

चिंटू:- म्हणजे मग एखाद्या Transport वाहनाने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केले तर CF आणि DA असतोच का?
        पिंटू;- सर्वच वाहनांच्या बाबतीत नसतो मगाशी आपण बोललो काही Transport वाहनांना परवान्याची आवश्यकताच नसते मग त्या वाहनांना DA देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून तशा वाहनांना फक्त CF द्यायचा असतो.  
       बर पुरे झाले तुझे प्रश्न इतरांचे पण परमिट संबंधित प्रश्न असतील तर त्यांना पण संधी दे, विचारा आपले प्रश्न…

२८ एप्रिल २०२१

कराड-रणभुमी

भूगोलमध्ये एक Concept आहे, Determinism त्याचा ढोबळ अर्थ असा होतो की मानवाचे वर्तन हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीने निश्चित केलेले असते. उदाहरणार्थ कराड या शहराबद्दल, जो प्रदेश कृष्णा-कोयना या नद्यांमुळे एकदम सुपीक आहे, जिथे फक्त बी टाकले उत्पन्न मिळते सहसा अशा प्रदेशातील लोक मिळालेल्या नैसर्गिक संपत्तीमुळे आळशी होतात.
अशाच विचारात कराड गाठलं कारण काय तर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी. पहिल्याच दिवशी बघितलं की कॉलेज सुरू व्हायच्या आधी कॉरिडॉर मध्ये पुस्तक घेऊन बसलेले विद्यार्थी, कॉलेजच्या समोरच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज त्यावर त्यांच्या माजी विद्यार्थ्यांने UPSC मध्ये यश मिळवलेल्याबद्दलच होर्डिंग, तिथुनच ऊस घेऊन जात असलेली बैलगाडी या अशा आणि इतर कारणामुळे Determinism चा सिध्दांत फेल गेला आणि आठवला तो भूगोलमधील आणखी एक Concept आहे Possibilism म्हणजे मानव सभोवतालच्या वातावरणाने किंवा निश्चित केलेल्या परिस्थितीवर स्वतःच्या जोरावर मात करू शकतो. म्हणजेच की विचार केला तसे कराडचे लोक आळशी नसुन मेहनती, कष्टाळू आहेत.
असच नेहमी ज्ञान मिळवून आपल्या विचारांची चौकट रुंद करावी हे आमच्या महाविद्यालयाने शिकवले तर आयुष्यात सर्व दुःख विसरून नेहमी हसत खेळत कसे जगायचे हे आमच्या वसतिगृहाने ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पार्ले, कराड) शिकवले. अशाच या कराडच्या रणभूमीवर आयुष्याची चार वर्ष लढावं लागलं, या लढाईत टिकवून ठेवलं ते एकलव्य अभ्यासिकेने आणि इथं भेटलेल्या जिवाभावाच्या काही मित्र-मैत्रीणीने . आयुष्याची अशी ही लढाई आता या रणभूमीपासून 600-700 किमी दूर सुरू आहे.
शेवटी इतिहासातील एक प्रसंग आठवतोय पानिपतच्या युद्धात नजीब खानने मराठयांच्या सेनापती दत्ताजी शिंदेला विचारले " क्यूॅं सरदार और लढोंगे?" त्यावर दत्ताजीने उत्तर दिले 'क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे"
अशीच ही आपली लढाई बचे है इसलिय लढ रहे है।

१९ फेब्रुवारी २०२१

शिवाजीचा देव केला म्हणजे काय होते?

शिवाजीचा देव केला म्हणजे काय होते?
देव केला कि मग शिवाजीसारखे वागण्याची जबाबदारीराहत नाही.
" शिवाजीसारख वागा","रयतेला सतावू नका".
"बलात्कार करणार्यांना पाठीशी घालू नका"
"रयतेच्या भाजीच्या देठाला हाथ लावू नका"
स्वताच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण दुसर्या धर्माचा द्वेष करायला शिकवू नका"
अस सांगितले तर सरळ उत्तर येते आपण कुठे शिवाजी कुठे ? 
तो देवाचा अवतार आपण साधे माणूस.
आपल्याला कसे जमणार ?
आपण असेच वागायचे.
देव असल्याने वर्षातून एकदा छ. 'शिवाजी महाराज कि जय' म्हणायचे,
जयंती करायची,वर्गणी गोळा करायची,थोडी खर्चायची,थोडी खायची,जमली तर थोडी खर्चायची जास्त खायची. 
कपाळाला अष्टीगंध लावायचा,गुलाल उधळायचा कि काम झाले 
शिवभक्त आपण रिकामे, 
छ. शिवाजी सारखे वागायला भीती नाही. 
छ. शिवाजीने रयतेला मदत केली ,
आता त्याचे भोंदू भक्त रयतेला भीती घालण्यासाठी त्याचाच उपयोग करतात
दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर छ. शिवाजीचा झेंडा आणि फोटो लावायचा अन काळे धंदे करायचे 
हा छ. शिवाजीच्या नावाचा गैरवापर आहे.
छ.शिवाजीला नीट समजून घेतले पाहिजे.
जय शिवराय..!
जय शंभूराजे..!

संदर्भ :-"शिवाजी कोण होता ?"
- गोविंद पानसरे...

सुखी होण्याचं गुपित

          "द अल्केमिस्ट" या पुस्तकाबाबत स्पर्धा परीक्षेच्या एका डेमो लेक्चर मध्ये ऐकायला मिळाले. म्हटलं वाचूया हे पुस्तक पण आपल्या...