संघर्ष हा तुझा लहान नसतो
की माझा मोठा नसतो
संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...
संघर्ष म्हणजे लढा असतो
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संकटांचा वेढा असतो
तरीही अशा परिस्थितीत आनंदाने गायलेला पाढा असतो
कारण मित्रा शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...
संघर्ष हा सिनेमाएवढा नाट्यमय नसतो
तर समाजाने केला तेवढा थट्टामय पण नसतो
संघर्ष म्हणजे कधी नशीबाची शिडी तर कधी साप असतो
आणि या संघर्षाची काळोखी रात्र संपविणारा सूर्य
फक्त आणि फक्त तुझा मायबाप असतो
म्हणून मित्रा शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...
संघर्ष म्हणजे आयुष्यातील
कधी वळण तर कधी घाट असतो
अपयशानंतर मिळालेला पाठ असतो
तर यशानंतर डोक्यावर घेऊन मिरवलेला थाट असतो
पण शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...
संघर्ष हा त्या कर्णाचा
तू रोज जगत असलेल्या मरणाचा
की मरणासाठी रोज शोधत असलेल्या कारणांचा..
शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...
संघर्ष म्हणजे तुझ्या स्वप्नासाठी
कुटुंबाने लढलेला एक डाव असतो
तू लढला तर त्यांना मिळालेला योग्य तो भाव असतो
तुझ्याबरोबर जिंकलेला तुझा तो गाव असतो
म्हणून मित्रा शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा