१३ ऑक्टोबर २०२६

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate): सुरक्षिततेची आणि सुदृढतेची हमी

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ३

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate): सुरक्षिततेची आणि सुदृढतेची हमी

नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! देवीच्या आराधनेसोबत आपण जशी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेची प्रार्थना करतो, अगदी तशीच सुदृढता रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचीही असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आज या तिसऱ्या दिवशी आपण 'वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र' (Fitness Certificate) या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत.

मानवी शरीराची जशी वेळोवेळी आरोग्य तपासणी (Medical Check-Up) आवश्यक असते, तसेच वाहनांचे 'आरोग्य' म्हणजेच तांत्रिक तपासणी करणे, ही मोटार वाहन कायद्यानुसार सक्तीची बाब आहे. विशेषतः बस, ट्रक, टॅक्सी, रिक्षा आणि स्कूल बस यांसारख्या परिवहन (Transport) वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य असते. ही वाहने रोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामुळे त्यांचे ब्रेक, स्टेअरिंग, हेडलाईट्स, रिफ्लेक्टर्स, वायपर आणि टायरची स्थिती सुरक्षित व सुस्थितीत आहे की नाही, हे अत्यंत बारकाईने तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम परिवहन विभागाचे अधिकारी करत असतात.

प्रवासी वाहने (ऑटोरिक्षा, स्लीपर बस इत्यादी) आणि विशेषतः 'स्कूल बस'च्या बाबतीत हे प्रमाणपत्र अधिक संवेदनशील असते, कारण यात प्रवाशांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. अशा वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक), व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (GPS), अग्निशमन यंत्र (Fire Extinguisher) आणि आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit) सुस्थितीत असणे बंधनकारक आहे. तसेच नवीन सुधारणांनुसार आग प्रतिबंधक अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा म्हणून FDAS, FDSS, FAS, FPS बसवणे आवश्यक केले आहे. सोबतच, स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे सक्तीचे करून प्रवासी वाहने अधिक सुरक्षित करण्यात आली आहेत.

मानवी हस्तक्षेप कमी करून वाहनाची अचूक तपासणी व्हावी; जेणेकरून केवळ सुस्थितीतील वाहनेच रस्त्यावर यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने बऱ्याच परिवहन कार्यालयात फिटनेस सर्टिफिकेटसाठी वाहनांची तपासणी ही 'ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन' (ATS) मध्ये केली जाते. तिथे बहुतांश चाचण्या मशिन्सद्वारे अत्यंत अचूकपणे घेतल्या जातात. याच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, १५ वर्षांवरील परिवहनेतर (Non-Transport/ खाजगी) वाहनांचे फिटनेस देखील आता मशिन्सद्वारेच तपासले जाणार आहे. जर एखादे वाहन या तपासणीत सदोष आढळले, तर त्यातील तांत्रिक त्रुटी पूर्णपणे दूर केल्याशिवाय त्याला फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही.

परिवहन (Transport) वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्राची मुदत ही वाहनाच्या नोंदणीपासून पहिल्या ८ वर्षांपर्यंत 'दर दोन वर्षांसाठी' असते आणि ८ वर्षांनंतर तिचे 'दरवर्षी' नूतनीकरण करावे लागते. तर परिवहनेतर (खाजगी) वाहनांसाठी १५ वर्षांनंतर दर ५ वर्षांनी हे नूतनीकरण करणे सक्तीचे असते. मुदत संपलेले (अनफिट) वाहन रस्त्यावर चालवणे म्हणजे निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. विना-फिटनेस वाहन चालवल्यास मोठा दंड तर आकारला जातोच, पण दुर्दैवाने अपघात झाल्यास विमा कंपनीकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही.

आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण सर्व वाहनमालक मिळून हा संकल्प करूया की, आपण आपल्या वाहनांची नियमित देखभाल करू आणि त्याचे 'योग्यता प्रमाणपत्र' नेहमी अद्ययावत ठेवू. वाहनाची सुदृढता हीच आपल्या सुरक्षित प्रवासाची खरी हमी आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate): सुरक्षिततेची आणि सुदृढतेची हमी

नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ३ वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate): सुरक्षिततेची आणि सुदृढतेची हमी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच...