नवरात्री विशेष लेखमाला – दिवस ९
गुड समरिटन कायदा आणि अपघातग्रस्तांना मदत: माणुसकीची खरी उपासना
नवरात्रीच्या नवव्या माळेच्या आणि उद्या येऊ घातलेल्या विजयादशमीच्या (दसरा) सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! दसरा म्हणजे अज्ञानावर ज्ञानाच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण. गेल्या आठ दिवसांपासून आपण रस्ते सुरक्षेच्या आणि परिवहन विभागाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आज या लेखमालेच्या समारोपाच्या दिवशी आपण रस्ते सुरक्षेतील सर्वात संवेदनशील आणि माणुसकीच्या विषयावर बोलणार आहोत - तो म्हणजे 'गुड समरिटन' (Good Samaritan) कायदा आणि अपघातग्रस्तांना मदत.
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर अनेकदा उपस्थित लोक मदत करण्याऐवजी बघ्यांची भूमिका घेतात किंवा मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात मग्न असतात. "पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागेल", "आपला वेळ वाया जाईल", "नको त्या कायदेशीर कचाट्यात अडकू" किंवा "रुग्णालयात पैसे भरावे लागतील" अशा अनेक गैरसमजांमुळे आणि भीतीपोटी अनेकजण जखमींना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. याच उदासीनतेचा अत्यंत भयानक परिणाम म्हणजे, अपघातग्रस्त व्यक्तींना योग्य वेळी म्हणजेच 'Golden Hour' मध्ये (अपघातानंतरचा पहिला एक तास) वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांना नाहक आपले प्राण गमवावे लागतात.
ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नागरिकांच्या मनातील भीती कायमची दूर करण्यासाठी मोटार वाहन कायद्यामध्ये 'गुड समरिटन' (Good Samaritan) ची तरतूद केली आहे. तसेच अपघातग्रस्तांना 'Golden Hour' मध्ये कॅशलेस आणि विनाअडथळा उपचार मिळवून देण्यासाठी 'पीएम-राहत' (PM-RAHAT) ही योजना लागू करण्यात आली आहे.
अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या नागरिकाला खालीलप्रमाणे कायदेशीर संरक्षण आणि हक्क दिले आहेत:
- अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना एखाद्या व्यक्तीकडून अनावधानाने काही चूक झाली, तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
- मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता अत्यंत आदराने वागवले जाईल.
- अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात दाखल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पोलीस किंवा रुग्णालयाकडून पुढील प्रक्रियेसाठी थांबवून ठेवले जाणार नाही.
- कोणताही पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर मदत करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे नाव, ओळख किंवा पत्ता सांगण्याची सक्ती करू शकत नाही.
- रुग्णालये अशा मदत करणाऱ्या नागरिकांकडे उपचारांचा खर्च म्हणून पैशांची कोणतीही मागणी करू शकत नाहीत.
- जर मदत करणाऱ्याने स्वतःहून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye-witness) होण्याची तयारी दर्शवली, तर त्याला वारंवार बोलावले जाणार नाही. त्याची साक्ष त्याच्या सोयीनुसार नोंदवली जाईल. मदत करणाऱ्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून साक्ष नोंदवण्यासाठी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'चा जास्तीत जास्त वापर केला जाईल.
शासनाकडून अशा प्रकारे मदत करणाऱ्या आणि प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना रोख बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.
आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपण हा संकल्प करूया की, रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्ती दिसल्यास आपण व्हिडिओ काढत न बसता, कोणतीही कायदेशीर भीती न बाळगता एक चांगला नागरिक बनून त्याचे प्राण वाचवण्यासाठी पुढे येऊ. आपण सर्वांनी 'अपघातमुक्त महाराष्ट्र' घडवण्याचा संकल्प करूया. दुसऱ्याचा जीव वाचवणे, हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची आणि देवीची सर्वात मोठी उपासना आहे!
सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या 'नवरात्री विशेष लेखमालेला' आपण सर्वांनी जो उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुम्हा सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी आणि दसऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा